रमजानचा महिना होतोय गोड

करोनाच्या संकटामुळे लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे कामगार-मजूर यांच्यासमोर रोजच्या खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच गोवंडी, कुर्ला, भांडुप, भिवंडी येथील मुस्लिम कामगार वस्त्यांमध्ये विविध संस्थांच्या मदतीने रमजानच्या काळात पुरेसे खाणे मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गोवंडीच्या गौतमनगरमध्ये सुमारे १२० कुटुंबे राहतात. त्यांना आतापर्यंत शिजवलेले अन्न पुरवण्यात येत होते. रमजान सुरू झाल्याने पहाटे तीन किंवा चारला त्यांच्यापर्यंत शिजवलेले अन्न पोहोचवणे शक्य नव्हते. त्यासाठी त्यांना कडधान्य, काबुली चणे, कांदे, बटाटे असे पुढील किमान १५ दिवस पुरेल एवढे साहित्य देण्यात आले. खजुराचाही त्यात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती येथे धान्यवाटपाचे नियोजन करणारे समद यांनी दिली.

काही कामगार इथे एकटे राहतात. त्यांच्याकडे अन्न शिजवण्याची काही सोय नाही. ब्रेड-बटर किंवा खिचडी, पावभाजी त्यांना दिली जाते. तर फळे उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक दुकानदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी समाजसेवी संस्थांसोबतच, काही स्थानिकही मदत करत आहेत, असेही समद यांनी सांगितले.

प्रथम या संस्थेतर्फे सुमारे एक हजार कुटुंबीयांना शिधा पुरवला आहे. रमजानमध्ये भज्यांचे प्रकारही केले जातात. त्यामुळे बेसनाचा समावेश शिध्यामध्ये केल्याचे या योजनेचे समन्वयक किशोर भामरे यांनी सांगितले. याशिवाय मुलांसाठी हॉर्लिक्स, सेरेलॅक देण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक कुटुंबाला पाऊण किलो खजूरही पोहोचवण्यात आला आहे. सध्याच्या योजनेनुसार शिजवलेले अन्न ३ मेपर्यंत पुरवण्यात येईल.

मुंबई फूड प्रोजेक्टमध्ये मुंबई महापालिका आणि प्रथमतर्फे लॉकडाउन जाहीर झाल्यापासून दररोज सुमारे ३० ते ३५ हजार लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्यात येत आहे. रविवारपर्यंत एकूण १० लाख तयार अन्नाचे डबे त्यांनी मुंबई, विरार भागांतील विविध गरजूंपर्यंत पोहोचवले आहेत.