सर्कस कलाकारांची जगण्याची कसरत!

१३ मार्चपासून रॅम्बो सर्कसचे कलाकार ऐरोलीतच

लॉकडाउनमुळे खेळाविनाच काढावे लागताहेत दिवस

पावसाळ्यातील उपजीविकेची मोठी चिंता

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्रात सर्कसचे प्रस्थ कायम राखून असलेल्या रॅम्बो सर्कसच्या ऐरोली येथे उभारण्यात आलेल्या तंबूमध्ये सध्या नव्या खेळांचा सराव सुरू आहे. आसाम, पश्चिम बंगाल, केरळ अशा विविध राज्यांमधून आलेले कलाकार पुढील काळासाठी तयारी करत आहेत. मात्र एकीकडे मनोबल कायम राखण्यासाठी हे सारे कलाकार एकमेकांच्या सोबतीने उभे असले तरी यंदा पावसाने दिवाळीच्या सुट्यांवर पाणी फिरवले आणि आता १३ मार्चपासून या सर्कसचा कारभार ठप्प असल्याने लॉकडाउन संपल्यानंतर पावसाचे महिने कसे काढायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

परीक्षा संपून बच्चेकंपनी सर्कसकडे वळणार तोच जगभरात करोनाचा वाढता कहर सुरू झाला आणि रॅम्बो सर्कसवाल्यांनी याची जाणीव बाळगत १३ मार्चपासून सर्कस बंद केली. त्यांच्या तंबूची क्षमता साधारण १ हजार ५०० लोकांची आहे. यापैकी सुमारे ६० टक्के तंबू उन्हाळी सुट्यांच्या काळात भरतो. उन्हाळी सुट्यांच्या जिवावर पावसाचे चार महिने सहज निघून जातात. मात्र २०१९मध्ये या सर्कशीला पावसामुळे मोठा फटका बसला. ही सर्कस त्या काळात पुण्यात होती. पावसाने सर्कसच्या शोवर तर परिणाम केला, मात्र कात्रजच्या पुराने त्यांना न भूतो न भविष्यती परिस्थिती दाखवली. त्यामुळे यंदा दोन्ही वेळी अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. मे महिन्यात ही सर्कस ऐरोलीच्या मुक्कामानंतर जोगेश्वरीला जाणार होती. मात्र आता ऐरोलीमध्ये सुरक्षित राहण्याला प्राधान्य दिले जाईल, असे सर्कसच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यांनी ४५ दिवसांचे मैदानाचे भाडे भरले आहे. मात्र आता हा कालावधी वाढवून मिळावा यासाठी सिडकोला विनंती करण्यात येणार आहे.

ऐरोलीच्या या तंबूमध्ये सध्या ८० कलाकार असून त्यांच्या जेवणाची सोय नवी मुंबई महापालिका, स्थानिक नगरसेवक, काही स्वयंसेवी संस्था करत आहे, असे या सर्कशीचे मालक सुजीत दिलीप यांनी सांगितले. रॅम्बो सर्कसच्या चमूला काही दिवसांपूर्वी महिनाभर पुरेल, इतके रेशन पुरवण्यात आल्याचे प्रथम संस्थेचे किशोर भामरे यांनी सांगितले. रॅम्बो सर्कसच्या चमूमध्ये एक घोडा आणि काही कुत्रेही आहेत. या प्राण्यांसाठी अन्नाची सोय लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी करण्यात आली होती. मात्र हा कालावधी जसा लांबत जाईल तसे अनेक प्रश्न समोर येणार आहेत. या कलाकारांना पगार कसा द्यायचा, हे कलाकार गावी असणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना पैसे कसे पाठवणार, काही कलाकारांकडे बँक अकाऊंटही नाहीत त्यामुळे पैसे पाठवायचे झाल्यास काय करायचे, असेही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत. सर्कशीमध्ये दैनंदिन खर्च सुमारे २५ हजार रुपयांचा आहे.

आर्थिक आधार हवा

लॉकडाउननंतरही सर्कशीचे कार्यक्रम आयोजित करू देण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे यासाठी त्यांनी केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. सुजीत दिलीप यांनी राज्य सरकारने १५ लाखांचे कर्ज कमी व्याजदराने सध्या तात्पुरते उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती केली आहे. हे कर्ज पुन्हा सर्कस सुरू झाल्यानंतर परत फेडण्यात येईल, यामुळे राज्यावरही बोजा पडणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कलाकारांचाही धीराने सामना

सर्कसचे मुख्य विदूषक आणि ऐरोलीमध्ये सर्कशीचे कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे बिजू नायर गेली ४० वर्षे सर्कशीत काम करतात. या आधी असे दिवसेंदिवस अडकून राहण्याची वेळ कधीच आली नव्हती. दंगलींच्या वेळीही काही दिवसच काम बंद होते. मात्र ते लवकरच सुरू झाले, अशी आठवण सांगितली. सर्कशीतील कलाकार अनेक संस्थांकडून मिळणाऱ्या अन्नधान्याच्या मदतीच्या बळावर उभे आहेत, त्यांनी धीर सोडलेला नाही. ही सर्कस म्हणजे एक मोठे कुटुंबच आहे, असेही ते म्हणाले. या कलाकारांना, गावी जाण्याचा आग्रह धरण्यात अर्थ नाही, तिथे जाणे अधिक धोकादायक आहे, असे नायर यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे मानून घरी जाण्याचा विचार न करता हे कलाकार तंबूतच राहत आहेत.